
आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नांमुळे कराड दक्षिणमध्ये रस्त्यांचे जाळे गतिमानहोत असून रस्ते विकासासाठी 227 कोटींचा निधी मंजूर
आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नांमुळे हायब्रिड अन्युईटी मॉडेल टप्पा – 2 अंतर्गत पाटण तालुका हद्द – किरपे – विंग – वाठार – रेठरे – शेणाली स्टेशन (पाटण तालुका हद्द ते शेणोली स्टेशन रस्ता – एकूण लांबी 38.50 कि.मी.) या रस्त्याच्या सुधारणेसाठी महाराष्ट्र भाजपा महायुती सरकारकडून 227 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. कराड दक्षिणमधील रस्त्यांच्या विकासासाठी इतक्या मोठ्या निधीला मंजुरी मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.
राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस व सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रवींद्रजी चव्हाण यांच्या सहकार्यामुळे आणि डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे भाजपा महायुती सरकारकडून या निधीला मंजुरी मिळाली असून, या रस्त्याचे काम लवकरच पूर्णत्वास जात आहे.
डिचोली – नवजा – हेळवाक – मोरगिरी – साजूर – तांबवे – विंग – वाठार – रेठरे – शेणाली स्टेशन रा. मा. 148 कि.मी. 62/500 ते 101 (एकूण लांबी 38.50 कि.मी.) हा अत्यंत महत्वाचा राज्यमार्ग असून, गुहागर – चिपळूण – कराड- जत- विजापूर राष्ट्रीय महामार्ग १६६–ई या महामार्गास समांतर मार्ग आहे.
दरम्यान, पाटण तालुका हद्द किरपे – विंग – वाठार – रेठरे – शेणाली स्टेशन हा रस्ता बागायती क्षेत्रातून जाणारा अत्यंत महत्वाचा रस्ता आहे. या रस्त्यावर ऊसवाहतूक मोठ्या प्रमाणात होते. तसेच या रस्त्यावर मोठ्या लोकसंख्येची अनेक गावे आहेत. तसेच हा राज्यमार्ग पुढे जाऊन, आशियाई महामार्ग क्र. 47 व राष्ट्रीय महामार्ग 266 या दोन्ही महामार्गांना जोडतो. त्यामुळे या रस्त्याचे रुंदीकरण व मजबुतीकरण झाल्यामुळे या संपूर्ण परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांना त्याचा मोठा फायदा होणार आहे.
या निधीच्या मंजुरीमुळे कराड दक्षिण मतदारसंघातील किरपे, येणके, पोतले, घारेवाडी, विंग, धोंडेवाडी, काले, वाठार, रेठरे खुर्द, रेठरे बुद्रुक, जुळेवाडी व शेणोली स्टेशन या गावांमधून जाणाऱ्या रस्त्याचे सुधारीकरण केले जाणार आहे. त्यामुळे कराड दक्षिणमधील रस्त्यांचे जाळे भक्कम होऊन आणखी गतिमान होण्यास मदत होणार आहे.