
५० कोटींचा निधी उपलब्ध करून देत वाखाण रोड ते कोरेगाव कार्वे रस्त्याचे रुंदीकरण व फुटपाथसह स्वतंत्र सायकल ट्रकचीही होणार निर्मिती
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या व विशेषतः कराड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील असलेले आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नांमुळे आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीनजी गडकरी व राज्याचे तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रवींद्रजी चव्हाण यांच्या विशेष सहकार्यामुळे कराडच्या विकासासाठी केंद्रीय रस्ते आणि पायाभूत सुविधा निधी (CRIF) अंतर्गत 50 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. या 50 कोटींच्या निधीतून कृष्णा नाका – वाखाण रोड ते कोरेगाव कार्वे-कोडोली या 10 किलोमीटरच्या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार आहे.
याशिवाय स्मार्ट सिटीच्या धर्तीवर या रस्त्यावर पादचाऱ्यांसाठी फूटपाथसह स्वतंत्र सायकल ट्रॅकची निर्मिती केली जाणार आहे. ज्यामुळे मॉर्निंग वॉक अथवा सायकलिंग करणाऱ्या आरोग्यहितदक्ष नागरिकांसाठी सुरक्षित व स्वतंत्र मार्गाची सोय उपलब्ध होणार आहे. तसेच या रस्त्यावर अन्य अनुषंगिक सेवासुविधा जसे की, प्रसाधनगृह, स्वच्छतागृहे, पार्किंग स्लॉट, सायकल पार्किंग स्टॅन्ड अशा विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. सदर प्रकल्पामुळे कराड शहराच्या सौंदर्यात ही भर पडण्यास मदत होणार आहे.