
ऑलिम्पिकवीर पैलवान खाशाबा जाधव यांच्या स्मरणार्थ गोळेश्वर (ता.कराड) येथे शासनाच्यावतीने उभारण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कुस्ती क्रीडा संकुल आराखड्याचे सादरीकरण
कराड तालुक्यातील गोळेश्वर येथील पैलवान खाशाबा जाधव यांनी भारताला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून दिले होते. त्यांच्या या कार्याचे स्मरण व्हावे आणि त्यापासून नव्या पिढीला प्रेरणा मिळावी, यासाठी पैलवान खाशाबा जाधव यांच्या गोळेश्वर गावी त्यांच्या नावाने आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती क्रीडा संकुल उभारण्याचा शासनाने निर्धार केला आहे. या संकुलाच्या कामाला लवकरात लवकर प्रारंभ व्हावा यासाठी मी प्रयत्नशील आहे. काही महिन्यांपूर्वी याप्रश्नी शासकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन, क्रीडा संकुलाच्या सद्यस्थितीबाबत माहिती घेतली होती. याचपार्श्वभूमीवर राज्याचे क्रीडामंत्री ना. दत्तात्रय भरणे यांची भेट महत्त्वपूर्ण होती.
मुंबईतील शशी प्रभू ॲन्ड असोसिएटस् यांनी या कुस्ती क्रीडा संकुलाचा आराखडा तयार केला असून, बैठकीत सिनीअर आर्किटेक्ट अमृता पारकर यांनी या आराखड्याचे सादरीकरण केले. कुस्तीसाठी निश्चित केलेले आंतरराष्ट्रीय स्टँटर्ड लक्षात घेऊन हा आराखडा तयार केला गेला आहे. यावेळी क्रीडामंत्र्यांनी या आराखड्याचे कौतुक केलेच शिवाय क्रीडा संकुलामुळे ग्रामीण भागातील उदयोन्मुख खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा मिळण्यास मदत होईल, त्यासाठी या संकुलाच्या कामाला तातडीने गती देऊ तसेच आवश्यक त्या पातळीवर तांत्रिक मान्यतेचे आदेश देण्यासाठी तत्परतेने कार्यवाही करू अशी ग्वाही भेटीदरम्यान दिली. बैठकीस समवेत कराडच्या तहसीलदार कल्पना ढवळे, तालुका क्रीडा अधिकारी संगीता जगताप उपस्थित होत्या.

