
छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमच्या विकासासाठी ९६.५० कोटींचा निधी मंजूर
कराडकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेले छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम कराड शहराची शान आहे. याठिकाणी रणजी क्रिकेट सामनेही खेळले गेले होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून या स्टेडियमची दुरावस्था झाल्याने स्टेडियमचे नुतनीकरण व्हावे, अशी मागणी क्रीडाप्रेमींमधून होत होती. जानेवारी 2024 मध्ये रेठरे बुद्रुक येथील य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्यावतीने आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनानिमित्त राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस कराड येथे आले असता डॉ. अतुलबाबा भोसले यांनी स्टेडियमच्या विकासासाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली. त्यावेळी ना. फडणवीस यांनी लवकरच स्टेडियमचा विकास आराखडा तयार करुन, निधी देण्याची घोषणा या कार्यक्रमात केली होती.
त्यानुसार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी तातडीने पावले उचलत, विकास आराखडा तयार करण्यासाठी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत छ. शिवाजी महाराज स्टेडियमची पाहणी करुन, खेळाडू व क्रीडाप्रेमींशी चर्चा केली. तसेच त्यांच्या सूचना व अपेक्षा जाणून घेत तयार केलेला स्टेडियमचा विकास आराखडा, फेब्रुवारी 2024 मध्ये ना. देवेंद्रजी फडणवीस यांना सादर केला. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन, राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस व ना. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने स्टेडियमच्या विकासासाठी तब्बल 96.50 कोटींचा निधी मंजूर केला.
कराड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमच्या विकासासाठी प्रथमच एवढा भरघोस निधी प्राप्त झाल्याबद्दल, कराडमधील क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. तसेच डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नातून हा निधी मंजूर झाल्याने कराडमधील क्रीडाप्रेमींचे स्वप्न साकार होणार आहे. लवकरच छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमचा कायापालट होणार असून, क्रिडाप्रेमींना सर्वसोयींनियुक्त स्टेडियम उपलब्ध होणार आहे. त्यामुळे महायुती सरकारच्या या निर्णयाचे कराडकरांमधून स्वागत होत आहे. शिवाय या निधीसाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्याबद्दल क्रीडाप्रेमींमधून डॉ. अतुलबाबा भोसले यांचे अभिनंदन केले जात आहे.
